आभास
सांज वेळ हि, व्याकुळ मन हे
का भास तो, आलीस तू ।
अशीच अवचित भेटाया मज
जाणीव मजला आलीस तू ।।
एक अनामिक गंध पसरला
श्वासांना त्या स्पर्शून गेला,
ओळखीचा तो सुगंध आला
जसा गंध मातीचा ओल्या ।।
अशीच अवचित भेटाया मज
जाणीव मजला आलीस तू ।।
एक अनाहत तरंग आला
हृदयी लहर कंपुनी गेला
श्वास थांबला ,स्वर थरथरला
आठवणींच्या हिंदोळ्यांवर, झुलला ।।
अशीच अवचित भेटाया मज
जाणीव मजला आलीस तू ।।
हलक्या दबक्या पावलांचा
मंजूळ किणकिण पैंजणांचा
नाद ध्वनी तो कानी आला
क्षण आभासी तुझा स्पर्शला।।
अशीच अवचित भेटाया मज
जाणीव मजला आलीस तू ।।