मायाजाल
जग हे मायाजाल, सख्या रे , जग हे मायाजाल
चंद्र सूर्य अन नभी तारका
उंच पर्वत अन नदी सागरा
हे विश्व खरे की सगळी माया
दिसती डोळ्या म्हणुनी मानले
इंद्रधनू चे रंग आंधळ्या सांग कसे समजावे
जग हे मायाजाल, सख्या रे , जग हे मायाजाल
मिटताच डोळे संसार हा लोपला
जगी स्वप्नी रचिला मीच सारा हा पसारा
राहिलो ना मी इथे, संसार काय राहील सांगा
जग हे मायाजाल, सख्या रे , जग हे मायाजाल
ज्या क्षणी मी मिटले डोळे
गच्च काळोखाचे पसरले जाळे
हेच खरे शाश्वत, का ते सारे जग मायाजाल.
अद्भुत मायाजाल म्हणावे
जग हे मायाजाल, सख्या रे , जग हे मायाजाल
हे माझे ते माझे, मी केले
माझ्या भोवती हे जग गुंफले
मिटले डोळे श्वास थांबला
माया जगी या अंधार दाटला
ना मी राहिलो ना ही माया
जग हे मायाजाल, सख्या रे , जग हे मायाजाल